वेळ-अमावस्या : उत्सव परंपरा कृषी संस्कृती, परंपरा आणि सामुदायिक एकोपा यांचा अनोखा संगम
ग्रामीण संस्कृतीचा वारसा, पारंपरिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस...
वेळ-अमावस्या : उत्सव परंपरा कृषी संस्कृती, परंपरा आणि सामुदायिक एकोपा यांचा अनोखा संगम
कर्नाटक–महाराष्ट्र सीमाभाग तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत वेळ-अमावस्या हा पारंपरिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस १९ डिसेंबर रोजी मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येत आहे. प्रतिवर्षी मार्गशीर्ष/पौष महिन्यातील अमावस्येला ग्रामीण संस्कृतीत कुलदैवत पूजन, निसर्गपूजन व कृषीरक्षण यांचा सुंदर संगम साधला जातो.
विशेषतः कलबुर्गी,बीदर, सोलापूर, लातूर,भालकी, उदगीर, निलंगा, औसा इत्यादी परिसरात हा उत्सव अत्यंत श्रद्धेने पाळला जातो. या दिवसाच्या पूर्वतयारीसाठी पहिल्या दिवशी विविध पारंपरिक पदार्थांची तयारी केली जाते. भज्जी, आंबील,रोडगे, (विशिष्ट प्रकारची भाकर), खिचडी,वरण-फळं(पिठापासून उकडलेले पदार्थ), कानवले, खीर, पिठापासून बनवलेले दिवे असे अनेक विशिष्ट पदार्थ तयार करून पूजनासाठी सज्जता केली जाते. अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये कडब्यापासून तयार केलेली ‘कोपी’ (एक प्रकारची झोपडी) उभारून कोपीवर शाल पांघरून पूजनाची व्यवस्था करतात.

येणाऱ्या दिवशी सकाळी गावातील सर्वजण आपापल्या शेतात जातात. तेथे महालक्ष्मीचे पूजन करून निवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर सर्वजण एकत्र बसून पारंपरिक पदार्थांचे भोजन करतात. कोपीवर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आदराने जेवण घालण्याची परंपरा आजही मोठ्या जिव्हाळ्याने पाळली जाते. झोके खेळणे, पतंग उडवणे आदी पारंपरिक खेळांमुळे शेतशिवार आनंदाने फुलून जाते.
संध्याकाळी साधारण सहा वाजल्यानंतर शाल पांघरून सजवलेली ‘डाल’ (शिंदी झाडापासून विणलेली मोठी टोपली) डोक्यावर घेऊन ग्रामस्थ गावाकडे प्रस्थान करतात. गावातील महालक्ष्मीचे सामूहिक पूजन झाल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी परततात. महिलावर्ग, तरुणाई व ज्येष्ठ नागरिकांमध्ये या दिवशी विशेष उत्साह पाहायला मिळतो.
पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘वेळ’ वनस्पतीचे पूजन, घरगुती देवघरात दीपदान, हळद-कुंकू, ओटी-भरवणी अशा पारंपरिक प्रथांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जातो. महिलांमध्ये एकमेकींना कुंकू लावून मंगलाशीर्वाद देण्याची परंपरा या दिवशी विशेष रंगतदार होते.
वेळ-अमावस्या हा केवळ धार्मिक दिवस नसून गावकऱ्यांना एकत्र आणणारा, परंपरा जपणारा, आध्यात्मिक चिंतनाचा आणि सामाजिक एकता दृढ करणारा महत्त्वाचा उत्सव आहे. निसर्गाशी असलेले नाते, मातृशक्तीचे पूजन आणि पितृ परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आणि संस्कृती टिकविण्याच्या दृष्टीने हा दिवस ग्रामीण संस्कृतीचा वारसा ठरत आहे.

– अशोक गुरनाळे




