#विशेष बातमी: लातूरचे ‘स्मार्ट’ वास्तव की नरकयातना?
गांधी मार्केटमधील 'त्या' घाणीच्या तलावावर बसून होतेय भाजी विक्री प्रशासनाच्या डोळ्यावर अजूनही पट्टीच!

लातूर l प्रतिनिधि
“सत्ता येते, सत्ता जाते… चेहरे बदलतात, पण नशीब बदलत नाही,” अशीच काहीशी भावना सध्या लातूरच्या मध्यवर्ती भागातील गांधी मार्केटमधील भाजी विक्रेते आणि ग्राहकांची झाली आहे. लातूर बस स्टँडच्या शेजारी आणि विकास बँकेच्या अगदी जवळ असलेल्या या बाजारपेठेने शहराच्या स्वच्छतेचे धिंडवडे काढले आहेत.
भयंकर वास्तव: मुतारीच्या साचलेल्या पाण्यात बाजार!
या ठिकाणी भाजी मार्केटच्या अगदी खाली मुतारीचा खुला टँक असून, त्याचे सांडपाणी साचून तिथे अक्षरशः घाणीचा तलाव झाला आहे. याच दुर्गंधीत, याच दूषित वातावरणात भाजी विक्रेते आपला जीव मुठीत धरून बसतात. ज्या अन्नावर अख्खे शहर जगते, ते अन्न अशा नरकयातना देणाऱ्या ठिकाणाहून येते, ही लातूरकरांसाठी शरमेची बाब आहे.
मच्छी आणि चिकन मार्केटची स्थिती तर विदारक!
केवळ भाजीपालाच नाही, तर गांधी मार्केटमधील मच्छी आणि चिकन विक्रेत्यांची अवस्था यापेक्षाही भयानक आहे.
कुटुंबाची खळगी भरण्यासाठी हे विक्रेते स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता अशा अस्वच्छ ठिकाणी व्यवसाय करत आहेत. प्रचंड दुर्गंधी, साचलेला कचरा आणि रोगांना आमंत्रण देणारे वातावरण, हेच येथील ‘वास्तव दर्शन’ आहे.
❓ निवडणूक आली… आता तरी परिवर्तन होईल का?
महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मागील कित्येक वर्षांपासून शहराचा विकास रखडलेला आहे. लोकप्रतिनिधी आणि माजी नगरसेवकांनी या प्रश्नाकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या वल्गना करणाऱ्या प्रशासनाला या साचलेल्या घाणीचा वास येत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
जनतेचा सवाल:
१. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला?
२. निवडणुकीत मते मागायला येणाऱ्या नेत्यांना ही घाण दिसणार का?
३. विक्रेत्यांना सुरक्षित आणि स्वच्छ जागा कधी मिळणार?



